Pages

Tuesday, July 13, 2010

आयुष्यात कुणीतरी असावं......

आयुष्यात कुणीतरी असावं, हातात हात धरणारं
कोसळत्या पावसात सोबत, ओलं चिंब भिजणारं
स्टेशनच्या बाहेर वाट पाहायला लावणारं
उशीर झाला म्हणून खोटी कारणं सांगणारं

आयुष्यात कुणीतरी असावं, माझ्यासोबत असणारं
डोळे बंद केल्यावर, स्वप्नात खुदकन हसणारं
सकाळी उठल्यावर मऊ धुक्यसारखं पसरणारं
काळोख्या रात्री चमचम चांदण्यासारखं खुलणारं

आयुष्यात कुणीतरी असावं, खूप प्रेम करणारं
कितीही काही झालं तरी, न विसरता येणारं
कधी दूर जाताना, आठवणींचा पाऊस देणारं
दूर असतानाही , माझ्याच मनात राहणारं

आयुष्यात कुणीतरी असावं, हातात हात धरणारं
कोसळत्या पावसात सोबत, ओलं चिंब भिजणारं....

Friday, July 9, 2010

तुझ्यापासून दूर....

तुझ्यापासून दूर जाणं, मला कधी जमलंच नव्हतं
तुझ्याशी अबोला धरणं, मला कधी सुचलंच नव्हतं

तुझं नेहमीचं रुसण, मी कधी टाळलच नव्हतं
तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून, मी स्वप्न कधी पाळलच नव्हतं

तू मला न दिसण, मला कधी खपलच नव्हतं
पण हे असंच होईल, मला कधी वाटलंच नव्हतं

तुझ्या डोळ्यांत पाणी, मी कधी आणलंच नव्हतं
माझ्या डोळ्यांतले पाणी, तू कधी पाहिलंच नव्हतं

माझं दुख ओठांवर, मी कधी आणलंच नव्हतं
मजपासून दूर जाताना, माझं मन तू कधी जाणलंच नव्हतं

आठवण

आठवण इथेही आहे, आठवण तिथेही आहे
दुरावा इथेही आहे, दुरावा तिथेही आहे
कितीही प्रयत्न केला, खोटे बोलायचा तरी
मन एकाकी आहे, इथेही आहे तिथेही आहे

थोडा राग इथेही आहे, थोडा राग तिथेही आहे
तुझी ओढ़ इथेही आहे, माझी ओढ़ तिथेही आहे
कितीही प्रयत्न केला, दूर जायचा तरी
जाण अशक्य आहे , इथेही आहे तिथेही आहे

एक प्रश्न आहे इथेही, एक प्रश्न तिथेही आहे
मनात तू इथेही आहे, मनात मी तिथेही आहे
कितीही प्रयत्न केला, न दाखवायचा तरी
मनात प्रेम आहे, इथेही आहे तिथेही आहे

पाऊस इथेही आहे, पाऊस तिथेही आहे
एक स्वप्न इथेही आहे, एक स्वप्न तिथेही आहे
कितीही प्रयत्न केला,विसरायचा तरी
फ़क्त तूच तू आहे, इथेही आहे तिथेही आहे