Pages

Friday, August 27, 2010

तिला काही कळलंच नसावं....

कदाचित तिला काही कळलंच नसावं
मनातलं प्रेम कधी दिसलंच नसावं
मीही कधी बोलायचा प्रयत्न केला नाही
पण प्रेमालाही का शब्दांचं बंधन असावं?

कदाचित तिला काही कळलंच नसावं
डोळ्यातलं पाणी कधी दिसलंच नसावं
मीही कधी दाखवायचा प्रयत्न केला नाही
पण अश्रूंनीही का रडतच ओघळावं?

कदाचित तिला काही कळलंच नसावं
तिलाही मी जवळ असो का बरं वाटावं?
तसा मी तिच्यापासून दूर नव्हतोच कधी
मग तिला मी नसणं कसं बरं कळावं?

कदाचित तिला काही कळलंच नसावं
माझं स्वप्न कधी पडलंच नसावं
आज वाटतंय तिला सर्व काही सांगावं, पण
तिचं नसणं मी स्व:ताला कसं बरं समजवावं?

कदाचित.....तिला काही कळलंच नसावं....

Sunday, August 22, 2010

यल्गार

झिडकारुनी शांततेला, आज पुन्हा यल्गार हो
फुंकुनी रणशिंग हे, आज पुन्हा ललकार हो

नसो चिंता वादळांची
नसो ओढ त्या चांदण्यांची
एकटे असतानाही,
भीती आहे कुणा अंधारांची

वाहू दे रक्तात बंड, आज पुन्हा तैयार हो
फुंकुनी रणशिंग हे, आज पुन्हा ललकार हो

नसो ओढ त्या स्वप्नांची
वा नसो साथ अपुल्यांची
संकटे असतानाही
नसो भ्रांत परिणामांची

अन्यायास सांग आता,आज पुन्हा संग्राम हो
फुंकुनी रणशिंग हे, आज पुन्हा ललकार हो

नसो सूचना संकटांची
वाट असो काट्यांची
पुढे चालतानाही
आहुती लागो श्वासांची

येऊ दे सामोरी काळ,मृत्यू आज स्वीकार हो
फुंकुनी रणशिंग हे, आज पुन्हा ललकार हो

Wednesday, August 18, 2010

शेवटची भेट

आज बहुदा तुझी माझी शेवटची भेट आहे
यापुढे तू कधी मला दिसणार नाहीस
दिसलीस तरी मला ओळखणार नाहीस
ओळखलंस तरी तू हसणार नाहीस
आज तू,
मला अगदी खेटून बाजूलाच बसली आहेस, पण
तुझ्यामाझ्यातले अंतर आता मोजण्यापलीकडे गेलंय
शांत मीही आहे...शांत तुही आहेस
पण मनात वादळ आज कुठे शांत होतंय?
आज आपल्यामध्ये वेळेलाही अस्वस्थ वाटतंय
आकाशही काळ्या ढगांनी दाटतंय
रोज पावसाला घाबरणारी तू,
आज पाऊस पडणार तरी थांबली आहेस
अंधाराला घाबरणारी तू,
आज माझ्याशिवाय कशी घरी जाणार आहेस तू?
आज माझ्याकडे फक्त प्रश्न आहेत
उत्तरं कदाचित तुझ्याकडेही नाहीत
आज जीवन एका विचित्र वळणावर आहे
काल दूर असूनही, तू जवळ होतीस
आज समोर असूनही, तू दूर आहेस
आता पर्यंत कसे बसे झेलले होते अश्रूंना
पण आता जास्त वेळ शक्य होणार नाही
भिजण्याची वाट पाहतोय
कदाचित तेव्हातरी मनापासून रडता येईल
तू घरी जायला निघशील आता, मला सोडून
डोळ्यातलं पाणी टिपत मी आज फक्त बघत राहीन
तुही आज माझ्याशी काही बोलू नकोस
स्वतःला सांभाळण मला जमत असलं तरी
तुझे डोळे पुसत, तुला समजावण मला नाही जमणार
तुला विसरणं मला कधी शक्य होणार नाही
खरंच, पण..................
आज बहुदा तुझी माझी शेवटची भेट आहे ............
आज बहुदा तुझी माझी शेवटची भेट आहे ............

उशीर

आज आपलं बाहेर जायचं ठरलं होत
मला यायला फारच उशीर झाला होता
मी लपून पाहिलं होत तुला,
तू उभी होतीस, तिथेच रोजच्या जागेवर
बहुतेक रागावली होतीस तू
माझं कारणही काही नवीन नव्हतं
मी आलो तुझ्याजवळ
तू पाठ फिरवलीस रागावून
मी तुला गरका मारून तुझ्यासमोर आलो
तू म्हणालीस,
"आज काय बोलणार आहेस तू?
आपण जाणार हेही विसरलास तू?
तासाभरापासून वाट पाहतेय मी तुझी
कोणत्या कामात इतका गुंतला होतास तू ?"
मी निरुत्तर होतो नेहमीप्रमाणे ,
पण वेळ मारून न्यायाची होती मला
मी तुझ्या मागे गेलो आणि लाडात म्हणालो
"तू रागावलीस ना कि खूप छान दिसतेस
गालातल्या गालात खूप छान हसतेस
माझ्या चुकांना खूप लवकर विसरतेस
अन म्हणूनच मला तू खूप आवडतेस"
तुझा राग आता कुठे टिकणार होता,
तू आता मागे वळली होतीस,
मी जागेवर स्तब्ध झालो होतो
तू माझ्या फार जवळ आली होतीस
आता तू माझ्या डोळ्यात बघून म्हणालीस
"माझ्यावर इतके प्रेम जन्मभर करशील ना?
मी नाही आल्यावर माझी वाट पाहशील ना?
मी रागावल्यावर मला मनावशील ना?
माझ्या स्वप्नात जन्मभर हरवशील ना?"
अचानक बोलता बोलता तू थांबलीस
त्या क्षणाला शांतताच मान्य होती वाटत
मला हि शांतता असह्य झाली
मी तुझा हात माझ्या हातात घेतला,
अन तुझ्या डोळ्यात पहिले,तेही ओले झाले होते,
तुझ्या माझ्यातलं दोन श्वासाचं अंतर जाणवत होतं
मी धीर केला अन म्हणालो,
"माझं तुझ्यावर प्रेम आहे, जन्मांपासून जन्मांपर्यंत
मी तुझी वाट पाहिल, शेवटच्या श्वासापर्यंत
खरंच तुला मी मनावेल, तू हसेपर्यंत
तूच तू असशील स्वप्नात, मी असेपर्यंत"
आता तू हसली होतीस, अन थोडी लाजली होती....
हे सर्व ऐकायची तुझी चाल मला पहिलेच समजली होती.....

Sunday, August 15, 2010

दुरावा

तुझ्या माझ्यातला दुरावा, आता वाढत चालला आहे
माझा शब्द शब्द शांततेत विरत चालला आहे
तुझं जवळ नसणं क्षणाक्षणाला जाणवतंय, पण
तुझ्यात गुंतलेला जीव आता हळूहळू सुटत चालला आहे

तुझ्या माझ्यातला दुरावा, आता वाढत चालला आहे
माझा क्षण क्षण तुझ्याविना सरत चालला आहे
आठवणींनी तुझ्या, डोळ्यांत पाणी दाटतंय, पण
माझा प्रेमावरचाच विश्वास आता हळूहळू उडत चालला आहे

तुझ्या माझ्यातला दुरावा, आता वाढत चालला आहे
आता हाच दुरावा आपला दुवा होत चालला आहे
तुझ्याशी शेवटंच बोलावं असं वाटतंय, पण
तुझ्यावरचा हक्क माझा, आता हळूहळू संपत चालला आहे

तुझ्या माझ्यातला दुरावा, आता वाढत चालला आहे
तुझ्यात गुंतलेला जीव आता हळूहळू सुटत चालला आहे.....

Thursday, August 12, 2010

पाउस...कधीचा पडतोय...

पाउस...कधीचा पडतोय...

माझ्यासारखा तोही आतून रडतोय...
प्रियेच्या विरहाने तोही गहिवरतोय...
रोजच्या रोज स्वत:शी तोही हरतोय...

पाउस...कधीचा पडतोय...

बेभान वारासारखा तोही भरकटतोय...
क्षण क्षण काचेसारखा तोही तुटतोय...
रोजच्या रोज एकाकी तोही मरतोय...

पाउस...कधीचा पडतोय...

जीवनापासून तुटून आज तोही संपतोय...
क्षितिजाखाली आज तोही लपतोय...
प्रेमाला गारवा देऊन आज तोही जातोय...

पाउस...कधीचा पडतोय...बाहेरही अन आतही ...
पाउस...कधीचा पडतोय

Sunday, August 8, 2010

आज मला... पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतंय...

आज मला... पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतंय...

तुझ्यासवे बेधुंद आकाशात उड़ावंसं वाटतंय
फ़क्त तू अन मी, दूसरा कुणीही नसेल तिथे
तुझ्यासोबत जीवनाचे स्वप्न बघावंसं वाटतंय

आज मला... पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतंय...

तुझ्या डोळ्यात फ़क्त स्वत:लाच पहावंसं वाटतंय
तुझ्या लाजण्यावर काही लिहावंसं वाटतंय
तुझ्यासोबत मला क्षण क्षण जगावंसं वाटतंय

आज मला... पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतंय...

तुला मनातलं सर्व खरं खरं सांगावंसं वाटतंय
थोडा घाबरतो मी सांगायला, पण खरं सांगतो
कधीतरी तुही माझ्या प्रेमात पडशील असंच वाटतंय

आज मला... पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतंय...
कधीतरी तुही माझ्या प्रेमात पडशील असंच वाटतंय.....

Sunday, August 1, 2010

आज जरा एकटं एकटंच वाटतंय

आज जरा एकटं एकटंच वाटतंय
तुला भेटायला मन सारखं तुटतंय
यावं म्हणतो, अडवायलाही कुणी नाही
पण हे अंतर अता जन्मागत भासतंय

आज जरा एकटं एकटंच वाटतंय
फक्त तुझंच बोलणं कानात वाजतंय
काहीतरी बोलावं म्हणून मीही बोलतो
पण माझ्या गळ्यात बोलणही दाटतंय

आज जरा एकटं एकटंच वाटतंय
तू इथं आहेस मला असंच भासतंय
शोधायला तुला मग मी डोळे उघडतो
पण ह्या डोळ्यांमध्ये फक्त पाणीच असतंय

आज जरा एकटं एकटंच वाटतंय
तुझ्याविना जगणं अता जड जातंय
ठाऊक आहे तू कधीच येणार नाहीस
पण वेड्या मनाला कुठे काय समजतंय ?

आज जरा एकटं एकटंच वाटतंय
पण हे अंतर अता जन्मागत भासतंय....