Pages

Sunday, March 27, 2011

शेवटांचा पाऊस....

चिंब भिजलेल्या पावसात, आठवतंय तुझं माझं सोबत असणं
माझं तुला थांबवणं आणि मनात नसतानाही तुझं नकार देत राहणं

मग वाफाळत्या चहात ती glucoseची biscuits खात राहणं
तुझं एक घास खाणं आणि पुढचा घास नकळत मला भरवत राहणं

मग तुझ्या भिजलेल्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात अजून भिजून जाणं
त्यात चहाच्या टपरीवरचा मिणमिणता बल्ब लाजून विजून जाणं

मग वेळ होईल म्हणून तुझं लपून लपून घड्याळाकडे पाहत राहणं
मधूनच ठीक असलेली ओढणी पुन्हा ओढून उगाच सरळ करत राहणं

ओल्या चिंब रस्त्यात चालताना तू तुझा हात माझ्या हातात देत राहणं
अन कधी हलकेच माझ्या मिठीत स्वतःला विसरून लपत राहणं

त्या पावसानंतर पुन्हा कधी माझ्या घरी कोणताच पाऊस आला नाही
तुझी उणीव विसरवू शकेल असा त्यानंतर चहाही कधी मी पिला नाही

Friday, March 25, 2011

ती वाट पाहत थांबली होती......

दूर जाऊन एकट्यात ती वाट पाहत थांबली होती
न जाणो कशी पण आज ती भेट थोडी लांबली होती
सर्व होते आज बरोबर अजून गर्दी कुठे पांगली होती
दूर जाऊन एकट्यात ती वाट पाहत थांबली होती

काल वेळ थोडी आधीची मी बदलून सांगितली होती
"वेळेवर येशील ना", ती काल ओरडून बोलली होती
"येईन वेळेवर", काल अशी वेळ मी मारली होती
दूर जाऊन एकट्यात ती वाट पाहत थांबली होती

कामं उरलेली कालची आज करायला सांगितली होती
पोटात दुखतंय म्हणून अर्धी सुट्टी मी मागितली होती
मग आमची madam आज माझ्यावरच डाफरली होती
दूर जाऊन एकट्यात ती वाट पाहत थांबली होती

मनाने cubicle मधून कधीच उडी बाहेर मारली होती
मनापुढे कामाची खरंच कुठे कधी काही चालली होती?
आणि पुन्हा माझी नजर त्याच झाडाखाली थांबली होती
अजूनही ती एकट्यात माझीच वाट पाहत थांबली होती

Saturday, March 19, 2011

कालच्या आठवणी

ह्या कालच्या आठवणी आज कुठून वाहुनी आल्या
मनाच्या पत्यावर अजूनही तुझा हक्क सांगुनी गेल्या

न जाणो कुठूनी उरला, आभास तुझ्या असण्याचा
अंदाज न कधी आला, तू नसूनही इथेच असण्याचा

निवडले मी माझे आकाश, तुझ्या गावी न दिसणारे
न जपले स्वप्न मी कधी, तुझ्या मिठीत संपणारे

मार्ग आपण निवडले होते, कुठे कधीच न मिळणारे
न होती हि जाणीव, न मिळताही होते ते दिसणारे

दूर असूनही तू,जवळ राहशील असं वाटलं नव्हतं
सोडून जाशील मला, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं

Thursday, March 17, 2011

आजकाल........

आजकाल लक्ष माझं कुठेच लागत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,

कधी तुझ्या मागे-मागे उडत जातं
कधी तुझ्या डोळ्यांमध्ये बुडून राहतं
कधी तुझ्याकडे पाहून लाजत हसतं
कधी नसताना तुझी वाट पाहत राहतं

तुझ्याकडे पाहायला त्याला कारणही लागत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,

तू समोर असताना काहीच सुचत नाही
दूर असताना दुसरं कुणीच रुचत नाही
गप्पांमध्ये तुझ्याविना कुणीच असत नाही
तुझ्यासोबत रात्र काळी कधीच भासत नाही

तुझ्याशिवाय स्वप्नांमध्ये स्वप्नच असत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,

अशी तू येशील जीवनात असं कधीच वाटलं नाही
मन पहिले कधी इतकंही हतबल वाटलं नाही
रात्रोरात्र कुणाच्या आठवणीत कधीच जागलं नाही
कुणाचं नसणं आयुष्यात पहिले कधीच खुपलं नाही

तुझ्याशिवाय जगणं मी जगणंच मानत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,

Monday, March 14, 2011

ती कायमची गेली...

का न जाणो नजरा फिरवून आज ती गेली
कालच्या क्षणांना एक प्रश्न देऊन आज ती गेली
न बघता मागे फक्त पुढे चालत आज ती गेली
का न जाणो पण आज ती कायमची दूर गेली

हाकेच्या अंतरावर हाकेपासून दूर ती गेली
डोळ्याच्या क्षितिजांवर पाऊस देऊन ती गेली
क्षण सोबतीचे स्वप्नात हलकेच ठेवून ती गेली
जाता जाता एक जखम हृदयावर देऊन ती गेली

श्वासांत असणारी कायमची सवय होऊन ती गेली
हृदयात असणारी सारी स्पंदनं थांबवून ती गेली
जुन्या प्रश्नांना नवीन उत्तर शोधण्यास ती गेली
जुन्या उत्तरांना एक नवीन शांतता देऊन ती गेली

जन्माची अंतरं क्षणात ओलांडून आज ती गेली
अंतरात किती जन्म न जाणो सोडूनी आज ती गेली
शेवटचा शब्द दाबून ओठातच आज ती गेली
का न जाणो पण आज ती कायमचीच गेली .......

Thursday, March 10, 2011

जखम

ते हरवलेले चेहरे आज पुन्हा एकदा समोर आले
अन सुकलेले जखम सारे पुन्हा एकदा चिघळू लागले

ते क्षण आमचे एकांतांचे
प्रेम घटका दोन घटकांचे
आकाश आमच्या दोघांचे

अगदी सर्वच पुन्हा एकदा मन माझे जळवू लागले
अन सुकलेले जखम सारे पुन्हा एकदा चिघळू लागले

आभास एकच असण्याचे
सर्वत्र फक्त तूच दिसण्याचे
डोळ्यात तुझ्या हरवण्याचे

दिवस तेही डोळ्यामध्ये कळत नकळत दाटू लागले
अन सुकलेले जखम सारे पुन्हा एकदा चिघळू लागले

आकाश आता ते शांततेचे
प्रश्न तुझ्या अनोळखी नजरेचे
अस्वस्थ श्वास त्या क्षणाचे

न काही बोलताच आपआपले मार्ग पुढे धाऊ लागले
अन सुकलेले जखम सारे पुन्हा एकदा चिघळू लागले

Monday, March 7, 2011

न जाणो...

लिलाव मांडला मी आज माझ्याच आसवांचा
न जाणो कोठुनी आला ऋतू ग्रीष्मात पावसांचा

ते कधीच न समजले हा खेळ नकळत गुंताण्याचा
मनातले मुके अश्रूही,कुण्या शब्दांविना जाणण्याचा

कुठे होता कधी तुटवडा, तुला माझ्याच सावल्यांचा?
पण सावल्यांनाही कुठे होता सहवास तुझ्या पावलांचा?

कळो कधी तुलाही, आरंभ झाला आहे आज शेवटांचा
न जाणो कोठुनी आला ऋतू ग्रीष्मात पावसांचा......

Tuesday, March 1, 2011

उणीव

विचारलेल्या प्रश्नाला तुझा अजूनही जवाब नाही
का तुला न हे कळो कि मी इतकाही खराब नाही?

मावळत्या सूर्याला का रोज धरेचा विचार नाही?
आज शापित चांदण्यांचा या धरेलाही स्वीकार नाही

आज तुझ्या पावसांचा माझ्या या रानी निभाव नाही
ओघळलेले अश्रू जपण्याचा अन माझा स्वभाव नाही

आज माझ्या असण्याची तुला क्षणभर जाणीव नाही
आज मलाही सावल्यांची एका कणभर उणीव नाही