आजकाल लक्ष माझं कुठेच लागत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,
कधी तुझ्या मागे-मागे उडत जातं
कधी तुझ्या डोळ्यांमध्ये बुडून राहतं
कधी तुझ्याकडे पाहून लाजत हसतं
कधी नसताना तुझी वाट पाहत राहतं
तुझ्याकडे पाहायला त्याला कारणही लागत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,
तू समोर असताना काहीच सुचत नाही
दूर असताना दुसरं कुणीच रुचत नाही
गप्पांमध्ये तुझ्याविना कुणीच असत नाही
तुझ्यासोबत रात्र काळी कधीच भासत नाही
तुझ्याशिवाय स्वप्नांमध्ये स्वप्नच असत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,
अशी तू येशील जीवनात असं कधीच वाटलं नाही
मन पहिले कधी इतकंही हतबल वाटलं नाही
रात्रोरात्र कुणाच्या आठवणीत कधीच जागलं नाही
कुणाचं नसणं आयुष्यात पहिले कधीच खुपलं नाही
तुझ्याशिवाय जगणं मी जगणंच मानत नाही,
आजकाल मनसुद्धा मनासारखं वागत नाही,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment